अंधेरी: मान्सूनला होणारा विलंब आणि पाण्याची वाढती चिंता या पार्श्वभूमीवर, मरोळचे ख्रिस्ती बांधव पावसासाठी शुक्रवारी संध्याकाळी विशेष प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमले.
कॅथलिक समाजामध्ये हरवलेल्या वस्तूंचे संरक्षक संत म्हणून पूज्यनीय असलेल्या संत अँथनी यांच्या सन्मानार्थ या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ८ वाजता, मरोळ येथील सेंट जॉन द इव्हँजेलिस्ट चर्चचे धर्मगुरू, फादर अँथनी फर्नांडिस यांनी मरोळ गावातील रस्त्यांवरून काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी संतांच्या मूर्तीला आशीर्वाद दिला.
प्रार्थनेच्या या कार्यक्रमात १०० हून अधिक ख्रिस्ती बांधवांनी सहभाग घेतला. मरोळ गावातून चालताना त्यांनी संत अँथनी यांची मूर्ती हातात घेतली. स्तोत्रे व प्रार्थना म्हटल्या. मान्सूनच्या विलंबामुळे पाण्याच्या उपलब्धतेवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबद्दल चिंता व्यक्त करत, भाविकांनी मुसळधार पावसासाठी परमेश्वराला साकडे घातले.
सहभागींनी सांगितले की, पुरेशा पावसाअभावी निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या काळात ही मिरवणूक श्रद्धा आणि सामुदायिक एकतेचे प्रदर्शन होते. अनेकांनी पाण्याच्या सध्याच्या चिंतेतून सुटका व्हावी आणि येत्या काही आठवड्यांत हवामान अनुकूल राहावे यासाठी तीव्र प्रार्थनेत सहभाग घेतला.
दुष्काळ किंवा पावसाला उशीर झाल्यास प्रार्थनेचा आधार घेण्याच्या अनेक कॅथलिक समुदायांमधील एका दीर्घकाळ चालत आलेल्या परंपरेचे हे आयोजन प्रतीक आहे. गुरुवारी, कुलवेम आणि गोराई येथील ख्रिस्ती बांधवांनी देखील अशाच प्रकारची प्रार्थना केली.
सामूहिक प्रार्थनेमुळे समाजाला दिलासा मिळेल. दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला पाऊस प्रार्थनेमुळे पडण्यास मदत होईल, अशी या ख्रिस्ती बांधवांची धारणा आहे. चर्चच्या आवारात प्रार्थनेने मिरवणुकीची सांगता झाली, असे फ्री प्रेस जर्नलचे वृत्त आहे.
