ohit 49 (1)

अंधेरी : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अंधेरी पश्चिम Andheri West परिसरातील चार व्यावसायिक आस्थापनांवर मोठी कारवाई करत अनधिकृत बांधकामे हटविली आणि विविध साहित्य जप्त केले. संबंधित हॉटेलांनी आवश्यक सेवा मार्ग (Service Area) आणि नियमानुसार मोकळी ठेवावयाची जागा अतिक्रमित करून व्यावसायिक वापरासाठी वापरल्याचे आढळून आले होते.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहिम राबवत वीरा देसाई रोड Vira Desai Road तसेच ऑफ न्यू लिंक रोड परिसरातील संबंधित आस्थापनांची तपासणी केली. तपासणीत बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली. व्हॉट इज युअर बहाणा What is your bahana, ट्रॉव्ह9 Trovh9, ज्युलीएट Juliet आणि याझू Yazuअशी या रेस्टॉरंटची नावे आहेत.

या मोहिमेदरम्यान अनधिकृत शेड, संरचना आणि इतर बांधकामे हटविण्यात आली. तसेच हॉटेल व्यवसायासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य, फर्निचर आणि स्वयंपाकघरातील उपकरणे जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील सेवा मार्ग आणि सार्वजनिक वापरासाठी राखीव जागा पुन्हा मोकळी करण्यात आली.

अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली के पश्चिम प्रभागाने ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील बांधकाम नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेने व्यावसायिक आस्थापनांना मंजूर आराखड्यानुसारच व्यवसाय चालविण्याचे आवाहन केले असून, सार्वजनिक जागा किंवा सेवा क्षेत्रांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे.

कारवाईचा भाग म्हणून, महापालिका पथकाने अतिक्रमित जागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू जप्त केल्या. जप्त केलेल्या साहित्यामध्ये २४ खुर्च्या, एक कुकिंग रेंज, एक मायक्रोवेव्ह ओव्हन, तीन कुलर, एक इलेक्ट्रिक फ्रायर आणि दोन स्पीकर यांचा समावेश आहे.

शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवणे, सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे आणि सार्वजनिक सुविधा सुरळीत राखणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितल्याचे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे.

छायाचित्र सौजन्य: फ्री प्रेस जर्नल