ड्रग्जविरोधात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; संशयित तस्कराला अटक
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेलच्या (ANC) आझाद मैदान युनिटने जोगेश्वरी परिसरात कारवाई करत एका संशयित ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ₹१.२६ कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईत ४१७ ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त करण्यात आले. त्याची अंदाजे किंमत ₹१.२५ कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय तीन MDMA गोळ्या आणि ₹२५ हजारांची रोकडही पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेल्या सर्व अमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे ₹१.२६ कोटी असल्याचे वृत्त आहे.
ANCच्या आझाद मैदान युनिटने मिळालेल्या माहितीच्या आधारे जोगेश्वरी परिसरात ही कारवाई केली. संशयित आरोपीकडून अमली पदार्थ जप्त केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अमली पदार्थ आणि मन:प्रभावी पदार्थ कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेले अमली पदार्थ आरोपीपर्यंत कुठून पोहोचले, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास ANCकडून सुरू आहे. ड्रग्ज पुरवठ्याचे संपूर्ण नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे, असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे.
टीप: सदर छायाचित्र एआय निर्मित आहे.
