खा. रवींद्र वायकरांचे मंत्री नितेश राणेंना पत्र

जोगेश्वरी: मुंबईच्या वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी खासदार रविंद्र वायकर (MP Ravindra Waikar) यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) यांना पत्र लिहिले. या पत्रात खा.वायकर यांनी ‘मुंबई जल मेट्रो’ (Mumbai Water Metro) प्रकल्पाचा प्रस्ताव मांडलेला आहे. या प्रस्तावाची दखल घेऊन मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाकडे सदर प्रस्ताव कार्यवाहीसाठी पाठवला आहे.

कोची वॉटर मेट्रोच्या(Kochi Water Metro) धर्तीवर, मुंबईच्या किनारपट्टीचा वापर करून जलमार्गाने प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. आगामी काळात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक क्रांतिकारी बदल घडवून आणेल याची मला खात्री आहे, असे खा. वायकर यांनी पत्रात म्हटले आहे.

पत्राचा सविस्तर मायना खालीलप्रमाणे-

उपरोक्त नमूद केलेल्या विषयाला अनुसरून मुंबई शहराला भेडसावणाऱ्या वाढत्या वाहतूक समस्यांकडे आपले लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे, विशेषतः सध्या सुरू असलेल्या जलद विकास आणि पुनर्वसन प्रकल्पांच्या संदर्भात. मोठ्या प्रमाणावर नियमित होणाऱ्या झोपडपट्टी पुनर्विकासामुळे विशेषतः भविष्यातील धारावी पुनर्विकास आणि मुंबईतील इतर सर्व उर्वरित झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामुळे दररोज प्रवास आवश्यक असलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या या दबावामुळेही, मुंबईतील अंतर्गत रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल झालेला नाही, परिणामी मोठी वाहतूक कोंडी आणि प्रवाशांसाठी गंभीर गतिशीलता (मोबिलिटी) समस्या निर्माण झाल्या आहेत. जसा विकास विस्तारत जाईल आणि पुनर्वसनामुळे हजारो नवीन रहिवासी शहराच्या विविध भागांत जोडले जातील, तसतशी कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीची मागणी अधिक तीव्र होईल.
या संदर्भात, कोची जल मेट्रोचा (Kochi Water Metro ) यशस्वी प्रकल्प मुंबईसाठी एक प्रेरणादायी नमुना आहे. एप्रिल २०२३ मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जींच्या हस्ते सुरू झाल्यापासून. कोची जल मेट्रोने आतापर्यंत सुमारे ४० लाख प्रवाशांना सेवा दिली आहे, ज्यामध्ये दररोज सरासरी ५,५०० ते ६,००० प्रवासी तेथे प्रवास करतात. पहिल्याच वर्षात या प्रकल्पातून २० लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. ही आकडेवारी किनारी शहरांमध्ये जल- आधारित सार्वजनिक वाहतुकीची व्यवहार्यता आणि विश्वासार्हता दर्शवते. अलीकडील केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समिती अभ्यास दौरा निमित्त, मला स्वतः कोचीमधील या प्रणालीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि तिची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सोय यामुळे मुंबईलाही अशाच मॉडेलचा मोठा फायदा होऊ शकतो याची खात्री पटली.
दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्राची (MMR) अपेक्षित वाढ पर्यायी वाहतूक उपायांचा शोध घेण्याची निकड अधोरेखित करते. एमएमआरची लोकसंख्या २०२३ मधील २.५८ कोटींवरून २०३० पर्यंत अंदाजे २. ९ कोटी आणि पुढे २०२७ पर्यंत ३.६ ते ३.८ कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अशा वाढीमुळे, पारंपरिक रस्ते-आधारित प्रणाली पुरेशा प्रमाणात गतिशीलता गरजा पूर्ण करू शकणार नाहीत. मुंबईच्या लांब समुद्रकिनाऱ्याचा आणि नैसर्गिक जलमार्गांचा उपयोग करणारी जल मेट्रो प्रणाली रस्त्यांवरील वाहतूक लक्षणीयरीत्या कमी करू शकते, शहरभर संपर्क सुधारू शकते आणि सार्वजनिक वाहतुकीचा एक पर्यावरणपूरक, इलेक्ट्रिक आणि आधुनिक पर्याय देऊ शकते.