मुंबई: अन्नभेसळीविरोधातील मोहिमेला वेग देत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अंधेरी पश्चिम (Andheri West) येथे मोठी कारवाई करत तब्बल ९०० किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. यासोबतच १७ किलो अनधिकृत कृत्रिम रंगद्रव्यांचाही साठा जप्त करून सील करण्यात आला. या कारवाईमुळे मुंबईतील अन्नभेसळीच्या वाढत्या प्रकारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एफडीएच्या अधिकाऱ्यांना अंधेरी परिसरात एका ठिकाणी चहा पावडरमध्ये भेसळ करून ती बाजारात विक्रीसाठी पाठवली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गिल्बर्ट हिल, अंधेरी पश्चिम येथील एकता हाऊसिंग सोसायटीवर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात चहा पावडरमध्ये कृत्रिम रंग मिसळल्याचे आढळून आले. तपासादरम्यान तयार मालासह रंगद्रव्यांचा साठाही आढळला.
अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या चहा पावडरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत सुमारे २.१८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र एफडीएने राज्यभरात सुरू केलेल्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत अन्नभेसळीविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. अलीकडील कारवायांमध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट उत्पादन युनिट्स आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
एफडीएने नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद अन्नपदार्थ किंवा भेसळीची माहिती त्वरित प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे. अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला असल्याचे लोकमत टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
