RPF जवानाच्या सतर्कतेने वाचले प्राण
मुंबई : जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल जाऊन तो लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील धोकादायक पोकळीत पडता-पडता वाचला. रेल्वे सुरक्षा दल (RPF) जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जवानांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
ही घटना 16 सप्टेंबरच्या रात्री जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर घडली. सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक प्रवासी धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा अचानक तोल गेला. त्यामुळे तो लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मधील पोकळीकडे झुकला. काही क्षणांतच तो ट्रेनखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
प्रवासी धोक्यात असल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल नागेश मोहिते यांनी तातडीने धाव घेत त्याला सुरक्षितपणे मागे ओढले. यावेळी आणखी एका RPF जवानानेही बचावकार्यात मदत केली. जवानांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे प्रवाशाचा जीव वाचला.
या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी RPF जवानांच्या प्रसंगावधानाचे आणि तत्परतेचे कौतुक केले. काही सेकंदांचा विलंबही गंभीर दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकला असता; मात्र जवानांनी वेळीच हस्तक्षेप करून संभाव्य दुर्घटना टाळली.
रेल्वे स्थानकांवर धावत्या लोकलमध्ये चढणे किंवा उतरणे अत्यंत धोकादायक आहे. जोगेश्वरीतील ही घटना प्रवाशांनी लोकल पूर्णपणे थांबल्यानंतरच चढावे किंवा उतरावे, याची पुन्हा एकदा आठवण करून देणारी ठरली आहे.
