अंधेरी- शुक्रवारी सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेने(BMC) अंधेरी पश्चिम(Andheri west) परिसरातून २०० बेकायदेशीर फेरीवाल्यांना(illegal hawkers) हटवले.

गेल्या तीन महिन्यांत मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिका अधिकाऱ्यांनी अशी कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये, दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातील सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्या सुमारे १०० अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यात आले होते.

“अंधेरी येथील सार्वजनिक जागा मोकळी करण्यासाठी आणि रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी स्टॉल लावणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांचे शुक्रवारी सकाळी हे स्टॉल हटवण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली,” असे एका महानगरपालिका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने असेही सांगितले की ही मोहीम सातत्याने सुरू राहील.

“आम्हाला वाहतूक विभागाकडून तक्रारी आल्या आहेत की फेरीवाल्यांमुळे रस्त्याच्या कडेने जागा कमी होत आहे. ज्यामुळे पादचाऱ्यांना तसेच वाहनचालकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. बेस्ट बसेससारखी(BEST buses) जड वाहने या रस्त्यांवर धावत असल्याने, फूटपाथ आणि रस्ते मोकळे राहावेत यासाठी फेरीवाले हटवणे आवश्यक होते,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने(Bombay High Court) परवाना नसलेल्या सर्व फेरीवाल्यांना बाहेर काढण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. महापालिकेने गेल्या वर्षी मुंबईतील रस्ते फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यासाठी पादचाऱ्यांसाठी अनुकूल धोरण देखील सुरू केले होते.

या मोहिमेचा एक भाग म्हणून, महापालिकेने रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातून अनधिकृत फेरीवाले हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे, असे इंडियन एक्सप्रेसचे वृत्त आहे.