विरार – विवा महाविद्यालय(Viva College), मिरा – भाईंदर, विरार- वसई पोलीस आयुक्तालय(Mira-Bhynder, Virar-Vasai) आणि बोळींज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ (World anti drugs day)तसेच ‘नशा मुक्त भारत’ या उपक्रमाला पाठिंबा देण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘अँटी ड्रग्ज स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, सहायक पोलीस निरीक्षक जयचंद्र ठाकूर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक निकम, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी २६ जून हा दिवस ” जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन ” म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधूनच उपक्रमांतर्गत नशा मुक्त भारत संकल्पनेवर रील बनवणे, गीत स्पर्धा, पोस्टर बनवणे, समूह नृत्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या विनाशकारी परिणामांबाबत माहिती देणे हा होता.
या स्पर्धांमध्ये विविध शाखांतील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. “नशा मुक्त भारत”, “औषध नव्हे विष”, “जगण्यासाठी नाही तर संपण्यासाठी आहे नशा” अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरणे केली. पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कलात्मकतेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्र ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, संस्थेचे खजिनदार श्री शिखर हितेंद्र ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
