अंधेरी: हिंदू नववर्ष स्वागत समिती, मरोळ तर्फे दरवर्षी गुढी पाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन केले जाते. अंधेरीमध्ये सर्वात प्रथम सुरु झालेली ही शोभा यात्रा आहे असे म्हटले जाते. शोभायात्रेचे यंदाचे हे २६ वे वर्ष आहे.
गुरुवार, १९ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता पंचवटी सोसायटी, मरोळ पोलीस कॅम्प समोरून शोभा यात्रेस सुरुवात होणार आहे. मरोळगावचे ग्राम दैवत श्री स्वयंभू पालेश्वर मंदिर येथे महाआरतीने या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात येईल. शोभायात्रेत कोणताही राजकीय पक्ष, राजकीय झेंडा, राजकीय चिन्ह, नेत्यांचे फोटो याचा वापर न करता केवळ पारंपारिक ध्वज, गुढी आणि महापुरुषांच्या प्रतिमा यांचा वापर करण्यात येणार आहे.
हिंदू नववर्ष स्वागत समिती, मरोळचे संस्थापक अध्यक्ष उमेश राणे यांनी मरोळमध्ये २६ वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रास्वसं), विश्व हिंदू परिषद (विहिंप), बजरंग दल व सर्व उत्सव मंडळाना, मंदिर संस्था यांना घेऊन सर्वप्रथम हिंदू नववर्ष स्वागत यात्रा सुरु केली. गेल्या वर्षी जल्लोषात शोभायात्रेचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘श्री राम ढोल ताशा पथका’ची स्थापना करण्यात आली. आज अनेक मुली मुले ढोल ताशा पथकात वादन करतात.
”जात- पात, प्रांत- भाषा, वर्ण-वर्ग सर्व काही विसरून आम्ही सर्व हिंदू एक आहोत. आमची काल गणना, नवीन वर्ष हे प्रतिपादे पासुन सुरु होते हा संदेश पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरु केलेला हा उत्सव जगभर साजरा होत आहे. मरोळमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात नववर्ष शोभायात्रा निघते. या शोभायात्रेत मरोळमधील सर्व हिंदू बांधवांनी पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या संख्येने सामील व्हावे,”
असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत समिती, मरोळचे संस्थापक अध्यक्ष उमेश राणे यांनी केले आहे.
