अंधेरीचे आमदार मुरजी पटेल यांनी मांडला विधानसभेत प्रश्न
अंधेरी: महाराष्ट्र विधीमंडळात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यासंबंधी अनेक महत्वाचे प्रश्न लोकप्रतिनिधी सभागृहात उपस्थित करतात आणि त्याला संबंधित खात्याचे मंत्री उत्तर देत असतात. गुरुवारी अंधेरी विधानसभेचे आमदार मुरजी (काका) पटेल Andheri MLA Murji Patel यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर Health Minister Prakash Abitkar यांना आरोग्य व्यवस्थेसंदर्भात प्रश्न विचारले.
खासगी व धर्मादाय रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांतील शुल्क आकारणीतील पारदर्शकतेचा आ. पटेल यांनी मुद्दा उपस्थित केला.
यासंदर्भात उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले की, बॉम्बे नर्सिंग अॅक्ट (Bombay Nursing Act) अंतर्गत रुग्णालयांना सेवा व उपचारांचे शुल्क सार्वजनिकरीत्या प्रदर्शित करणे बंधनकारक असून, अन्यायकारक अथवा अवाजवी शुल्क आकारल्यास कारवाईची तरतूद असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई उपनगरातील एकाही खासगी अथवा धर्मादाय रुग्णालयात असे शुल्कफलक प्रत्यक्षात दिसत नाहीत. परिणामी नागरिकांना उपचार, तपासण्या व इतर सेवांच्या शुल्कांची पूर्वकल्पना मिळत नाही. कायद्यात तरतूद असूनही अंमलबजावणी होत नसल्याची बाब आ. पटेल यांनी मांडत नियमांचे प्रभावी पालन निश्चित करण्याची मागणी केली. यावर उल्लंघन अथवा अन्यायकारक शुल्क आकारणी आढळल्यास शासन आवश्यक कारवाई करेल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली.
मुंबई उपनगरामध्ये स्वतंत्र असे लहान मुलांचे इस्पितळ Children’s Hospital उपलब्ध नसल्याची गंभीर बाब आ. पटेल यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. NBSU, SNCU, NICU व PICU सुविधांची उपलब्धता अपुरी असल्याने अनेक कुटुंबांना उपचारांसाठी उपनगराबाहेरील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत असल्याचा प्रश्न त्यांनी यावेळी मांडला.
मुंबई उपनगरात रुग्णालयांसाठी आरक्षित भूखंड उपलब्ध असूनही सर्वसमावेशक बालरुग्णालय उभे राहिलेले नाही. वाढती लोकसंख्या व आरोग्य गरजा लक्षात घेता अत्याधुनिक सुविधा असलेले स्वतंत्र असे लहान मुलांचे इस्पितळ उभारण्याची मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी हा विषय प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या BMC कार्यक्षेत्रातील असल्याचे नमूद केले. तथापि, बालआरोग्य सुविधांची गरज व उपलब्ध आरक्षण भूखंडांचा मुद्दा संबंधित प्राधिकरणांच्या निदर्शनास आणून देऊन आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुंबई उपनगरातील नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी या विषयांचा पुढेही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आ. मुरजी पटेल यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे.
