मुंबई : अंधेरी पूर्व येथील साकीनाका परिसरात टिंडर डेटच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. एका तरुणाची फसवणूक झाल्यानंतर त्याच्या मित्रांनीच गुप्तहेराची भूमिका बजावत पोलिसांच्या मदतीने हा घोटाळा उघडकीस आणला.
ही कारवाई पोलीस परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. १३ मार्च रोजी साकीनाका येथील हेवन टेरेस ७२ कॅफेवर टाकलेल्या छाप्यात या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आठ आरोपींना अटक करण्यात आली.
मित्रांनी आखली योजना
काही महिन्यांपूर्वी एका तरुणाची टिंडर डेटच्या नावाखाली सुमारे १५ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. त्यानंतर ३८ वर्षीय कापड व्यावसायिक पंकज यादव यांनी हा प्रकार उघडकीस आणण्याचा निर्णय घेतला.
यादव आणि त्यांच्या मित्रांनी टिंडरवर बनावट प्रोफाइल तयार करून या टोळीला जाळ्यात ओढण्याची योजना आखली. त्यानंतर यादव यांच्या एका मित्राने आमिष म्हणून ‘माहिरा’ नावाच्या महिलेबरोबर डेट ठरवली.
डेट दरम्यान उघड झाला प्रकार
टिंडरवर चॅट झाल्यानंतर त्या महिलेने संबंधित तरुणाला साकीनाका मेट्रो स्थानकाजवळ भेटण्यास सांगितले. त्यानंतर दोघेही जवळच असलेल्या हेवन टेरेस ७२ कॅफेमध्ये गेले.
तेथे भेटीदरम्यान त्या महिलेने अवघ्या ४० मिनिटांत सहा टकीला शॉट्सची ऑर्डर दिली. बिल मागविल्यानंतर त्याची रक्कम तब्बल १८,६१६ रुपये असल्याचे दिसून आले. यानंतर यादव यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांचा छापा
यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार साकीनाका पोलिसांनी कॅफेवर छापा टाकला. तपासादरम्यान या ठिकाणी टिंडरद्वारे ग्राहकांना आमिष दाखवून बोलावले जात असल्याचे उघड झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलांना कॅफेमध्ये शीतपेये दिली जात असत, तर ग्राहकांना महागडी दारू आणि खाद्यपदार्थ मागवण्यास प्रवृत्त केले जात असे. त्यानंतर २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत फुगवलेली बिले तयार करून ग्राहकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले जात होते.
पैसे न दिल्यास धमक्या
तपासात असेही समोर आले की, पैसे देण्यास नकार दिल्यास कॅफेतील कर्मचारी आणि बाऊन्सर्स ग्राहकांना धमकावत होते. काही प्रकरणांमध्ये खोट्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेक पीडितांनी भीतीपोटी पैसे देऊन तेथून निघून जाणे पसंत केले.
आठ आरोपी अटकेत
या प्रकरणात पोलिसांनी खालील आठ आरोपींना अटक केली आहे :
- मोहसिन झायेद हुसेन खान (२८)
- मयंक गुलचंद कतुरिया (२०)
- मयूर सुभाष दिदोले (२७)
- जतीन अरुण कुमार (२२)
- फैजल अब्दुल सलाम अली (२७)
- दीपक हरिपाल दास (२६)
- साहिल महेश कुशवाहा (१९)
- रोहित विनोद कुमार साहू (२३)
तपासकर्त्यांच्या मते या टोळीचा मुख्य सूत्रधार नितेश अंबास्कर असून तो सध्या फरार आहे. या रॅकेटमधील काही सदस्य दिल्ली आणि आसपासच्या भागातून मुंबईत आले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आणखी दोन ते तीन संशयितांचा शोध सुरू आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(४), ३०८(२), ३५२, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साकीनाका पोलीस करत आहेत, असे मिड डे च्या वृत्तात म्हटले आहे.
