अंधेरी: हिंदू नववर्ष स्वागत समिती, मरोळ तर्फे गुढी पाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक पोषाख परिधान करून मरोळकर मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. या शोभायात्रेत आमदार मुरजी पटेल हे पायी चालत सहभागी झाले होते. अंधेरीमध्ये सर्वात प्रथम सुरु झालेली शोभायात्रा असा या शोभायात्रेचा लौकिक आहे.
शोभायात्रेचे यंदाचे हे २६ वे वर्ष होते. गुरुवार, १९ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता पंचवटी सोसायटी, मरोळ पोलीस कॅम्प येथे या शोभायात्रेस सुरुवात झाली. ढोल, लेझिमच्या तालात शोभायात्रेचा जल्लोष टिपेला पोहोचला होता. या शोभायात्रेत महिला आणि लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता. जय श्री राम या घोषणेने संपूर्ण मरोळ जणू दणाणून गेले. महिला वर्ग नऊवारी साडी लेऊन, नाकात नथ घालून, डोक्यावर भगवा फेटा परिधान करून मराठमोळ्या वेशात भगवा पताका घेत जणू संस्कृतीच्या वाहक झाल्या होत्या. पुरुषांनी देखील डोक्यावर भगवे फेटे, कुर्ता-पायजमा घालून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मरोळगावचे ग्राम दैवत श्री स्वयंभू पालेश्वर मंदिर येथे महाआरतीने या शोभायात्रेचा समारोप झाला. यावेळी तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले. शोभायात्रेत कोणताही राजकीय पक्ष, राजकीय झेंडा, राजकीय चिन्ह, नेत्यांचे फोटो याचा वापर न करता केवळ पारंपारिक ध्वज, गुढी आणि महापुरुषांच्या प्रतिमा यांचा वापर करण्यात आला होता.
हिंदू नववर्ष स्वागत समिती, मरोळचे संस्थापक अध्यक्ष उमेश राणे यांनी मरोळमध्ये २६ वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रास्वसं), विश्व हिंदू परिषद (विहिंप), बजरंग दल व सर्व उत्सव मंडळाना, मंदिर संस्था यांना घेऊन सर्वप्रथम हिंदू नववर्ष स्वागत यात्रा सुरु केली. गेल्या वर्षी जल्लोषात शोभायात्रेचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘श्री राम ढोल ताशा पथका’ची स्थापना करण्यात आली. याच पथकाने ढोल ताशाने परिसर दणाणून सोडला.
या पदयात्रेत आमदार मुरजी पटेल हे आस्थेने सहभागी झाले होते. शोभायात्रेदरम्यान प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधत होते. प्रत्येकाला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत होते.
”गेल्या 26 वर्षांपासून शोभायात्रेची ही परंपरा मरोळकर जपत आहेत. आपली हिंदू संस्कृती व्यापक आणि भव्य आहे. तिचे दर्शन या शोभायात्रे दरम्यान घडते. विशेषतः नव्या पिढीला आपली हिंदू संस्कृती पुन्हा पुन्हा अनुभवयास मिळते. हेच या शोभायात्रेचे उद्दिष्ट आहे.”
असे या शोभायात्रेचे आयोजक आणि हिंदू नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष उमेश राणे यांनी सांगितले.




