दंड आकारल्याने विनातिकीट प्रवासी महिलेने महिला टीसीचा हात चावला
मुंबई : मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकात विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाने दंड आकारल्याच्या रागातून महिला तिकीट तपासनीसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित प्रवासी महिलेने महिला टीसीचा हात चावला तसेच नखांनी ओरखडे काढल्याचा आरोप आहे.
पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या ४२ वर्षीय महिला तिकीट तपासनीस हरप्रीत कौर कामत या बुधवारी विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये अंधेरी स्थानकावर तिकीट तपासणी करत होत्या. यावेळी एका महिला प्रवाशाकडे वैध तिकीट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित महिलेने आपली पर्स चोरीला गेल्याचे आणि तिकीट सापडत नसल्याचे सांगितले.
त्यानंतर टीसीने संबंधित महिलेकडून ५१० रुपयांचा दंड वसूल करून पावती दिली. मात्र, पावती तपासत असतानाच प्रवासी महिलेने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात टीसीच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी महिला घटनास्थळावरून पसार झाली. जखमी हरप्रीत कौर कामत यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ‘ऑपरेशन डीप’ या मोहिमेअंतर्गत ३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान विशेष तपासणी सुरू आहे.
या मोहिमेत तिकीट तपासनीसांना बॉडी कॅमेरे देण्यात आले असून, पहिल्या तीन दिवसांत दररोज सुमारे १,४०० विनातिकीट प्रवासी आढळल्याची माहिती समोर आली आहे, असे एनडीटीव्ही प्रॉफिटच्या वृत्तात म्हटले आहे.
या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवर कर्तव्य बजावणाऱ्या महिला तिकीट तपासनीसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
टीप: सदर छायाचित्र एआय निर्मित आहे.
