शनिवारी रात्री घडली दुर्दैवी घटना
मुंबई: अंधेरी भागातील ‘रुणवाल एलिगेंट’ या उंच इमारतीच्या १७ व्या मजल्यावर शनिवारी रात्री ९.१५ ते ९.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीदरम्यान लिफ्टमध्ये अडकल्यामुळे एका ४६ वर्षीय लिफ्टमनचा गुदमरून मृत्यू झाला.
धनपत महातू (वय ४६) असे मृत लिफ्टमनचे नाव असून ते गेल्या ९ वर्षांपासून या इमारतीत कार्यरत होते.
मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, फ्लॅट क्रमांक १७०१ मध्ये रात्री ९.५० च्या सुमारास आगीची नोंद झाली आणि रात्री १०.३७ वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका आणि के-पश्चिम प्रभाग कार्यालयाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनेनंतर धनपत महातू यांना तात्काळ महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले, असे मिड डेच्या वृत्तात म्हटले आहे.
