career sansad

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पार पडला सोहळा

विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा – युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी’ या उपक्रमांतर्गत विवा महाविद्यालय, विरार येथे जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून करिअर संसदेची स्थापना व पदग्रहण शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दिपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, करिअर कट्टा सहसमन्वयक डॉ. रोहन गवाणकर, करिअर कट्टा समितीचे सदस्य सहाय्यक प्राध्यापक विकास लालजी गुप्ता,डॉ. रश्मि गुरुनानी , सहाय्यक प्राध्यापक केयूर लिंबाचिया तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, लोकशाही मूल्ये, सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य आणि जबाबदारीची जाणीव विकसित करण्याच्या उद्देशाने ‘करिअर संसद’ ही संकल्पना राबविण्यात येते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शासकीय विभागांच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. कौशल्य विकास, उद्योजकता, माहिती व जनसंपर्क, नियोजन, कायदे व शिस्त, रोजगार यांसारख्या विभागांचे कार्य समजून घेत विद्यार्थ्यांना नेतृत्व विकसित करण्याची संधी उपलब्ध होते. तसेच तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून करिअर घडविण्यासाठीही या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते.

करिअर संसदेसाठी जुलै महिन्याच्या सुरुवातीला इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी करून करिअर कट्टा समन्वयक व प्राचार्या यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी करिअर कट्टा कार्यालयाकडे पाठविण्यात आली.

शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री कृष्णा दिलीप पांडे, नियोजन मंत्री गौरव किशोर जांगिड़ , कायदे व शिस्तपालन मंत्री सानिका चौगुले , सामान्य प्रशासन मंत्री वैष्णवी महतो, माहिती व प्रसारण मंत्री निश जानवळेकर, उद्योजकता विकास मंत्री रिद्धी सिंग, रोजगार स्वयंरोजगार मंत्री खुशी संते, कौशल्य विकास मंत्री, क्षितिजा किशोर जाधव संसदीय कामकाज मंत्री झैनब सय्यद, महिला व बालकल्याण मंत्री वैष्णवी दास, सदस्य श्रुती विजय इपते यांनी पदाची शपथ घेतली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना करिअर कट्टातर्फे प्रमाणपत्र, करिअर डायरी आणि नियुक्तीपत्र प्रभारी प्राचार्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.