अंधेरी- मरोळ(Marol) मधील भवानी नगर (Bhavani Nagar) येथील उद्यानाचे उदघाटन आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांच्या हस्ते रविवारी सकाळी पार पडले. यावेळी भवानी नगर येथील लहान मुले आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईमध्ये जागेअभावी लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाहीत, ज्येष्ठ नागरिकांना विसावा घेण्यासाठी उद्याने नाहीत. अशावेळी मरोळकरांसाठी भवानी नगर येथे नवीन उद्यान(New Garden) उपलब्ध झाले आहे. या नवीन उद्यानाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी या उद्यानाचे उदघाटन केले.
महापालिकेने या उद्यानाला उर्जितावस्था दिली. सदर उद्यानामध्ये वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी झोका, घसरगुंडी अशी अनेक साहित्य उपलब्ध आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना विसावा घेण्यासाठी बाक देखील उपलब्ध आहेत.
लोकार्पण सोहळ्यानंतर लहान मुलांनी उद्यानात खेळून उद्यानाचा मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी भाजपचे नेते उमेश राणे, अशोक देसाई, शिवनाथ खैरनार, शिवसेना नेते रोहन सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
