माजी उपमहापौर राजेश शर्मा यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकावर सर्व लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांना नियोजित थांबा देण्यात यावा, अशी मागणी मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले असून, या सुविधेमुळे परिसरातील रहिवाशांचा लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
अंधेरी स्थानकाला मेट्रोच्या दोन मार्गिकांची जोडणी असल्याने ते लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी योग्य ठरू शकते, असा युक्तिवाद शर्मा यांनी केला आहे. घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावरील (मेट्रो लाईन १) स्थानक रेल्वे स्थानकाला लागून आहे. तसेच मेट्रो लाईन ७ वरील गुंदवली स्थानकही वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे परिसरात काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील प्रवाशांना अंधेरीपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांना अंधेरी येथे थांबा दिल्यास सध्याच्या उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १० चा वापर करण्याची सूचना शर्मा यांनी केली आहे.
नियमित लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांकडून ही मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून रेल्वे प्रशासनाकडे औपचारिक मागणी केल्याचे शर्मा यांनी सांगितले.
सध्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. या गाड्यांना दादर, बोरिवली आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वसईसारख्या स्थानकांवर थांबे दिले जातात. दरम्यान, पश्चिम रेल्वेने दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून जोगेश्वरी येथे अतिरिक्त टर्मिनस उभारण्याचा प्रस्तावही मांडला आहे.
अंधेरी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना अतिरिक्त थांबे देणे हा केवळ वेळापत्रकात बदल करण्याचा विषय नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, गाड्यांचे संचालन, वेळेचे नियोजन आणि लॉजिस्टिकल समन्वय यांचा विचार करावा लागतो. या सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या स्थानकांवरच अतिरिक्त थांबे आणि टर्मिनसचे नियोजन केले जाते, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
अंधेरी हे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील प्रमुख बहुपर्यायी वाहतूक केंद्रांपैकी एक आहे. हे स्थानक पश्चिम आणि हार्बर या दोन्ही रेल्वे मार्गांना जोडते. स्थानकावरील नऊ प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात उपनगरीय प्रवासी वाहतुकीसह मर्यादित संख्येने लांब पल्ल्याच्या आणि एक्स्प्रेस गाड्यांचीही वाहतूक होते.
या स्थानकावर दररोज सात लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा होत असल्याचा अंदाज आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी येथे अनेक पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट आणि तिकीट खिडक्यांची सुविधा आहे. स्थानकाजवळ बस आणि ऑटो-रिक्षा थांबेही आहेत. उन्नत पादचारी मार्गाद्वारे मेट्रो लाईन १ पर्यंत थेट पोहोचता येते.
अंधेरी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे देण्याच्या मागणीवर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे, असे मुंबई मिररच्या वृत्तात म्हटले आहे.
