मुंबई: घरगुती वादातून पत्नीवर चाकूने वार केल्याच्या आरोपाखाली रविवारी अंधेरी पूर्व(Andheri East) येथील एका ४६ वर्षीय पतीला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, पत्नी आपल्या पतीसोबत राहण्यास तयार नव्हती या रागातून पतीने आपल्या पत्नीवर हल्ला केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता सागबाग रोडवरील(Saugbaug Road) आराध्या रुग्णालयाबाहेर ही घटना घडली. राजेश एकनाथ छत्रे असे या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याची पत्नी पंचशीला राजेश छत्रे (३८) हिच्यावर वादाच्या वेळी हल्ला केल्याचे हिंदुस्थान टाइम्सचे वृत्त आहे.

“राजेशची पत्नी त्याच्यासोबत राहण्यास तयार नसल्याने तो नाराज होता. भांडणाच्या वेळी त्याने तिला धरून ठेवले आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्यावर चाकूने अनेक वार करण्यात आले. यामध्ये पंचशीलाचा जागीच मृत्यू झाला,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पवई येथील राहिल रियाज लोखंडे (२७) या ऑटोरिक्षा चालकाने हा हल्ला पाहिला आणि नंतर पोलिसांशी संपर्क साधला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेशविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ (खून) च्या कलम १०३(१), तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ३७(१)(अ) आणि १३५ अंतर्गत तक्रार दाखल केली.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. रविवारी पहाटे राजेशला अटक करण्यात आली. पोलिसांनी हत्येचे हत्यार जप्त केले आहे. पुढील तपास सुरू आहे.