अंधेरी- बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंधेरी पश्चिमेतील (Andheri west) बेकायदेशीर बांधकामविरोधात कारवाई केली. ही अनधिकृत बांधकामे हटवल्यानंतर अंधेरीतील रहिवाशांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आभार मानले. ही अनधिकृत बांधकामे हटवल्याने रस्ते आणि फूटपाथ मोकळे होऊन वाहतूक सुधारली असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी (BMC Commissioner Bhushan Gagrani) आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंबई महापालिका शहरे आणि उपनगरांमध्ये अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी सातत्याने कारवाई करत आहे.
अंधेरी पश्चिमेमध्ये, उपायुक्त (झोन-३) विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान वीरा देसाई रोड (Vira Desai Road), कॅप्टन सामंत रोड (Captain Samant Road), जेपी रोड (JP Road) आणि अपना बाजार (Apna Bazar) परिसरातील बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात आले.
या कारवाईमुळे वाहनांची होणारी कोंडी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. रस्ते आणि पदपथ खुले करून सार्वजनिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.
ढाके वसाहत आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक रहिवासी संघटनांनी महापालिकेच्या मोहिमेचे स्वागत केले आहे. शनिवारी रहिवाशांनी महापालिका उपायुक्त (के-पश्चिम वॉर्ड) (BMC K-west ward) भाग्यश्री कापसे यांचा त्यांच्या कार्यालयात सत्कार केला. याप्रसंगी महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांचे रहिवाश्यांनी कौतुक केले.
महापालिका प्रशासनाने रहिवाशांना आश्वासन दिले आहे की, वाहतूक प्रवाह आणि नागरी सुरक्षितता सुधारण्यासाठी अशा प्रकारच्या उपाययोजना भविष्यातही सुरू राहतील, असे मिड-डेच्या वृत्तात म्हटले आहे.
