५२ वर्षीय प्रवाशाच्या छातीत घुसले धारदार शस्त्र, आरोपीला अटक
मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंधेरी रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये झालेल्या वादादरम्यान एका व्यक्तीने धावत्या लोकलच्या डब्यात धारदार शस्त्र फेकले. हे शस्त्र भांडण करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला न लागता डब्यातील एका ५२ वर्षीय प्रवाशाच्या छातीत घुसले. रविवारी घडलेल्या या घटनेत सुरेश द्वारका शर्मा हे गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी २५ वर्षीय आरोपी शिवाजी लक्ष्मण गायकवाड याला अटक केली आहे.
अंधेरी स्थानकाजवळ दोन प्रवाशांमध्ये वाद
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश शर्मा हे झारखंडमधील हजारीबाग येथील मूळ रहिवासी असून सध्या धारावी येथे राहतात. ते सुतारकाम करून उदरनिर्वाह करतात. कामानिमित्त ते बोरीवली पूर्व येथे गेले होते. तेथून परतताना त्यांनी सकाळी ११.५८ वाजण्याच्या सुमारास बोरीवली स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने जाणारी जलद लोकल पकडली होती.
शर्मा हे लोकलच्या पहिल्या जनरल डब्यातील पूर्वेकडील बाजूला उभे होते. त्याचवेळी त्यांच्या मागे बसलेल्या दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. लोकल अंधेरी स्थानकाजवळ येताच हा वाद अधिकच वाढला आणि दोघेही दरवाजाच्या दिशेने गेले.
धावती लोकल सुरू होताच चाकू फेकला
दुपारी १२.१२ वाजता लोकल अंधेरी स्थानकात पोहोचली. यावेळी दोघांपैकी एक प्रवासी फलाटावर उतरला, तर दुसरा डब्यातच राहिला. लोकल पुन्हा सुरू होत असताना फलाटावर उभ्या असलेल्या व्यक्तीने डब्याच्या दिशेने धारदार शस्त्र फेकले.
मात्र, हे शस्त्र लक्ष्य चुकवून डब्यातील सुरेश शर्मा यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले.
वांद्रे स्थानकात प्राथमिक उपचार
घटनेनंतर लोकल वांद्रे स्थानकात पोहोचल्यावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (MSF) जवानांनी जखमी शर्मांना प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या आरोपीला अटक
या प्रकरणातील आरोपीचे नाव शिवाजी लक्ष्मण गायकवाड (वय २५) असे आहे. तो विनातिकीट प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण अंधेरी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
