अंधेरी: मंगळवारी रात्री मरोळ येथील राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) प्रादेशिक केंद्रात NSG Regional Hub घुसून बांधकाम साहित्य चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांचा एनएसजी कमांडोंनी NSG Commando पाठलाग करून त्यांना पकडले. पवई पोलीस ठाण्यात Powai Police Station त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमिम सलीम शेख (३३) आणि सूरज गर्जन यादव (१८) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, कॅम्पमध्ये तैनात असलेले सहायक कमांडर बिजेंद्र सिंग हे रेंजर दत्तात्रय सातपुते यांच्यासोबत परिसरात गस्त घालत होते. रात्री सुमारे ११ वाजता, त्यांना अधिकाऱ्यांच्या मेससमोर असलेल्या अधिकाऱ्यांच्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पाजवळ दोन संशयित व्यक्ती दिसल्या.
चौकशी करण्यासाठी ते पुढे गेले असता, त्यांना संशयित खांद्यावर लोखंडी सळ्यांची बंडले घेऊन कंपाऊंडच्या भिंतीकडे येताना दिसले. शिडीचा वापर करून त्या दोघांनी भिंत चढून लोखंडी सळ्यांची बंडले कॅम्पच्या बाहेर फेकून दिली. मात्र, सुरक्षा कर्मचारी जवळ येत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी भिंतीवरून उडी मारली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणाची माहिती तात्काळ क्विक रिस्पॉन्स टीमला (QRT) देण्यात आली. असिस्टंट कमांडर रणजित कदम व त्यांच्या पथकाने कॅम्पबाहेर संशयितांना अडवून त्यांना चोरीच्या सामानासह ताब्यात घेतले. इतर सुरक्षा कर्मचारीही लवकरच घटनास्थळी पोहोचले.
सुरक्षा पथकाने एकूण १०० किलो वजनाच्या, चार फूट लांबीच्या लोखंडी सळ्यांची पाच बंडले आणि १० फूट लांबीचा एक लोखंडी चॅनल जप्त केला, असे मिड-डेच्या वृत्तात नमूद केले आहे.
