पाच जणांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक
मुंबई : अंधेरी पूर्व येथील मरोळ पाईपलाइन परिसरात दोन गटांमधील जुन्या वादाचे रूप हिंसक हाणामारीत बदलले आणि त्यात शिवम कनोजिया ऊर्फ गब्बर या तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी सहार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अब्दुल रझ्झाक याला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार रोहित नेगी आणि आरोपी गटातील अभय झा यांच्यात सुमारे वर्षभरापूर्वी वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या घटनेनंतरही दोन्ही गटांमध्ये अधूनमधून वाद होत होते. शिवम आणि त्याचे मित्र तसेच आरोपी हे सर्व मरोळ पाइपलाइन परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवारी रात्री जेवणानंतर रोहित नेगी हा शिवम आणि इतर मित्रांसह दुचाकींवरून अण्णावाडी ट्रक पार्किंग परिसरात गेला होता. त्याचवेळी आरोपींचा गटही तेथे पोहोचला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी रोहित आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
हाणामारीदरम्यान शिवम आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडला. त्यानंतर पाचही आरोपींनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
हाणामारीनंतर तरुणांचा गट तेथून निघण्याच्या तयारीत होता. शिवम हा आपल्या मित्राच्या दुचाकीवर बसत असताना आरोपी राज सिंह याने चाकू काढून त्याच्या मानेवर वार केल्याचा आरोप आहे. शिवम खाली कोसळल्यानंतरही त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शिवमला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हल्ल्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहितवरही हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहित नेगी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अब्दुल रझ्झाक याला अटक करण्यात आली आहे. राज सिंह, अमित चौधरी, अभिषेक शुक्ला आणि अभय झा या इतर आरोपींचा शोध सुरू असून पोलीस पुढील तपास करत असल्याचे हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
