सखे गं साजणी’च्या कुल पोस्टरची जोरदार चर्चा; प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर प्रमुख भूमिकेत
मित्रांसोबत केलेला प्रवास म्हणजे केवळ ठिकाणं बदलणं नव्हे, तर नाती अधिक घट्ट होण्याचा, स्वतःला नव्याने शोधण्याचा आणि आयुष्य वेगळ्या नजरेने पाहायला शिकवणारा अनुभव असतो. हाच मनमोकळा अनुभव मोठ्या पडद्यावर साकार करणारा ‘सखे गं साजणी’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तीन मित्रांच्या प्रवासाभोवती गुंफलेली ही कथा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमुळे चर्चेत आली असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
‘सखे गं साजणी’ मध्ये मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. पोस्टरवरील तिघांचा कुल आणि स्वछंदी अंदाज आजच्या तरुणाईला नक्कीच भावणारा आहे. निरभ्र आकाशाकडे पाहत, आयुष्य मनसोक्त जगण्याचा आनंद लुटण्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसून येते. पोस्टरवरूनच या तिघांची मैत्री हटके आणि खास असल्याचं स्पष्ट होतं.
हा चित्रपट अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते-दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब स्टुडिओ’ बॅनरखाली साकारला जात आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक जावकर यांनी केलं असून, निर्मितीची जबाबदारी अभिषेक जावकर, आदित्य वासुदेव घरत, अभिजीत खांडकेकर आणि श्रेयश विलास सावंत यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून अभिषेक दिलीप वाकचौरे आणि जातीं उपाध्याय यांनी साथ दिली आहे.
३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सखे गं साजणी’मध्ये प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांची ही जबरदस्त त्रयी मोठ्या पडद्यावर मैत्रीचा, भावनांचा आणि मनोरंजनाचा फुल्ल तडका घेऊन येणार आहे.
