वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर केला आनंदोत्सव
मुंबई : अंधेरी पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश माचिंदर यांची मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-१ मध्ये बदली झाल्यानंतर चक्क पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी घडलेला हा प्रकार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याचे प्रत्यक्षदर्शी पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश माचिंदर यांना यापुढेही कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच अंधेरी पोलीस ठाण्यातील आणखी सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या घडवून आणणार असल्याचा दावाही तिने केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यातील कर्मचारीही तिच्याविरोधात बोलण्यास धजावत नसल्याचे काही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपानुसार, संबंधित महिला पोलीस कर्मचारी वारंवार अधिकृत कामे आणि सुरक्षेच्या जबाबदाऱ्या टाळत असे. तिला काम सोपवले असता आत्महत्या करण्याची धमकी देत असे. तसेच आपले पती आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून सहकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार माचिंदर यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते. सार्वजनिक हित, कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासकीय गरजा या कारणांचा उल्लेख या आदेशात करण्यात आला होता. संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माचिंदर यांना तातडीने कार्यमुक्त करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मात्र, त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमागील नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार, संबंधित महिला कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही बदली करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणतीही विभागीय चौकशी न करता बदलीचे आदेश देण्यात आल्याचा आरोप आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना उमेश माचिंदर यांनी गुरुवारी सांगितले की, “संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून मला लक्ष्य केले जात होते. तिला कामाची जबाबदारी दिल्याबद्दल परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तिने मला दिली होती. तिच्या तक्रारीच्या आधारे माझी बदली करण्यात आली. मात्र, माझी बाजू ऐकून घेण्यासाठी कोणतीही विभागीय चौकशी करण्यात आली नाही.” असे टाईम्स ऑफ इंडियाचे वृत्त आहे.
