विरार: विरार येथील विवा महाविद्यालय येथे मराठी वाङ्मय मंडळ आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिना निमित्त “अनुवादन लेखन : तंत्र संवादाचे ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बीएएमएमसी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक महेश जगताप यांना निमंत्रित करण्यात आले होते. मराठी भाषेत अनुवादाचे महत्व, मराठी भाषा आणि संवाद, अनुवाद करताना घ्यावयाची काळजी, अनुवाद क्षेत्रातील भविष्यकालीन व्यवसायाच्या संधी, भाषेमुळे व्यक्तीवर होणारे संस्कार ,अभिजात मराठी भाषा, इत्यादी मुद्दे व्याख्यानात मांडण्यात आले.
या कार्यक्रमास मराठी वाङ्मय मंडळ समन्वयक कविता पाटील, ग्रंथपाल डॉ. नागरत्ना पलोटी, इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापिका जान्हवी नाईक, एम. ए .समन्वयक प्राध्यापिका रूपाली पाटील, डॉ. दिपाली चौधरी, एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपा दळवी, मराठी वाङ्मय मंडळाचे सर्व सदस्य, ग्रंथपाल विभागाचे सर्व सदस्य , प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी वांङ्मय मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुस्तक परीक्षण’ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथपाल डॉ.नागरत्ना पलोटी यांनी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेतील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व कर्मचारी विजेते, नॉलेज बीज विद्यार्थी समितीचे विद्यार्थी सदस्याचे असलेल्या योगदाना बद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
इतिहास विभागाद्वारे शिवकालीन दुर्ग संस्कार या संकल्पनेवर आधारित गड किल्ल्यांची प्रतिकृतींचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक प्रफुल सुरेश घाग, सहाय्यक प्राध्यापक अभिषेक माडये आणि आभार प्रदर्शन ग्रंथालय विभागाच्या सदस्या अंजली परांजपे यांनी केले.
