अंधेरी: खोपोली येथील केपी धबधब्याजवळील घनदाट जंगलात हरवलेल्या एका २० वर्षीय तरुणाची गुरुवारी संध्याकाळी सुटका करण्यात आली. सदर तरुण अंधेरी पूर्व(Andheri) येथे राहतो. यशवंती हायकर्स टीमच्या प्रयत्नांमुळे काही तासांतच अडकलेल्या गिर्यारोहकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, प्रियांशू गेडाम नावाचा हा तरुण गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झेनिथ धबधब्यापासून सुमारे ४ किमी वर असलेल्या दुर्गम अशा केपी धबधब्याकडे ट्रेकिंग(Trekking) करण्याच्या उद्देशाने खोपोलीमध्ये एकटाच पोहोचला होता. प्रियांशू एकट्याने जंगली भागात गेला आणि त्याचा मार्ग चुकला.
आपण अडकल्याचे लक्षात येताच प्रियांशूने महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (एमएमआरसीसी) मदत केंद्राशी संपर्क साधला. तिथे समन्वयक राहुल मेश्राम यांनी यशवंती हायकर्स खोपोली टीमचे पद्माकर गायकवाड यांना तातडीने माहिती दिली. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, एक बचाव पथक तातडीने त्या ठिकाणी पाठवण्यात आले.
“अनुभवी गिर्यारोहकांचा समावेश असलेले शोध पथक थोड्याच वेळात तेथे पोहोचले. एका दुर्गम आणि जंगलातील कठीण व धोकादायक ठिकाणी अडकलेला प्रियांशू त्यांना दिसला. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या पथकाने प्रियांशूला सुरक्षितपणे खोपोलीला परत आणले.” असे मेश्राम म्हणाले.
बचाव पथकात पद्माकर गायकवाड, प्रणित गावंड, निखिल गुरव, अभिजित देशमुख, अजय फाले, अतुल तेलंगे, शुभम पाटील आणि कुणाल पाटील यांचा समावेश होता. हे सर्व यशवंती हायकर्स गटाचे सदस्य आहेत.
